कुडाळ–गोवा मार्गावरील सांस्कृतिक वारसा जपणारं संग्रहालय- ठाकरवाडी आदिवासी कलादालन
सरसोली धामच्या शांत, निवांत, अध्यात्मिक भेटीनंतर आम्ही कुडाळहून गोव्याकडे निघालो असता, अगदी अनपेक्षितपणे आम्हाला एक ठिकाण सापडलं—आणि ते ठिकाण आमच्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय अनुभवांपैकी एक ठरलं. कुडाळ मधील पिंगुळी गावातील ठाकरवाडीमध्ये श्री. गणपत मसगे यांनी स्थापन केलेले हे कलादालन म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला, आदिवासी परंपरा आणि बी पारंपारिक भारतीय हस्तकलेचा खजिनाच आहे.
एक अनपेक्षित थांबा, जो बनला सांस्कृतिक अनुभव
खरं सांगायचं तर, हे ठिकाण केवळ वाटेत जाता जाता लागते म्हणून आम्ही पाहायचे ठरवले होते. पण हा साधा थांबा क्षणार्धातच एक समृद्ध असा मनाला भिडणारा अनुभव ठरला. आत प्रवेश करताच, दुर्मिळ लोकपरंपरा, प्राचीन वस्तू आणि लुप्त होत चाललेल्या कलांचे एक वेगळेच विश्व आमच्यासमोर उलगडत गेलं.
भर दुपारची वेळ असल्याने गर्दी नव्हती—फक्त आम्ही आणि एक उत्साही तरुण मार्गदर्शक. तो प्रत्येक गोष्ट इतक्या उत्कटतेने समजावून सांगत होता की आम्ही त्या भावविश्वात पार गुंतून गेलो. आमच्या नकळत आम्ही जवळजवळ तास दोन तास त्या विस्मरणात गेलेल्या कलात्मक वारशात रमलो.
ठाकर आदिवासी लोककला आणि परंपरांचे जतन
“ठाकरवाडी” हे नाव ठाकर आदिवासी समाजावरून पडले आहे. हा समाज तब्बल अकरा प्रकारच्या लोककलांमध्ये पारंगत आहे. त्या सर्व कलांचा सुंदर संगम या कलादालनामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय लोकसंस्कृती, लोककला यामध्ये रस असलेल्या पर्यटकांनी ह्या ठिकाणास अवश्य भेट द्यावी.
येथे पारंपरिक सादरीकरणांशी संबंधित वस्तू पाहायला मिळतात, जसे की:
- पांगुळ बैल
- गोंधळी
- भुते
- पोत
- वासुदेव
याचबरोबर, या सादरीकरणांमध्ये वापरली जाणारी वाद्ये, पारंपरिक पोशाख आणि धार्मिक वस्तू देखील इथे प्रदर्शित केल्या आहेत. याशिवाय शॅडो पपेट्री आणि कळसूत्री बाहुल्यांच्या खेळात वापरल्या जाणाऱ्या बाहुल्या व वाद्यांचा संग्रह इथे पाहायला मिळतो. विशेष आकर्षण म्हणजे शॅडो पपेट्री आणि कळसूत्री बाहुल्यांचा खेळ इथे करून दाखवला जातो. हळूहळू लय होऊ पाहत असलेल्या ह्या कलांचा आनंद आपल्याला इथे अनुभवता येतो.
प्राचीन वस्तू आणि पारंपरिक जीवनशैलीचा खजिना
या गॅलरीतील सर्वात खास गोष्ट म्हणजे भूतकाळातील दैनंदिन वापरातील वस्तूंचा मोठा संग्रह—ज्या एकेकाळी ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होत्या.
येथे तुम्हाला पाहायला मिळतील:
- नैसर्गिक रंगांमध्ये सागाच्या पानांवर काढलेली चित्रे व त्यासाठी लागणारे नैसर्गिक ब्रश
- पारंपरिक मासेमारीची जाळी आणि शेतीची साधने, घोंगडी
- तांबे-पितळी भांडी, मातीची भांडी आणि जुन्या पद्धतीचे दिवे
- बांबूपासून बनवलेली मोजपात्रे आणि सुपं
- वनौषधी आणि जुनी नाणी
हा विभाग म्हणजे जणू ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनशैलीचा जिवंत संग्रहच आहे.
सखाराम मसगे आणि कलात्मक वारशाला अभिवादन
या संग्रहालयात सखाराम मसगे यांना विशेष स्थान दिले आहे. मसगे कुटुंबाच्या कलात्मक प्रवासामागील ते प्रेरणास्थान होते. त्यांच्या वैयक्तिक वस्तू, वाद्ये आणि सुंदर चित्रमय रामायण येथे जतन करून ठेवले आहे.
तसेच, बांबूपासून बनवलेल्या विविध वस्तू—जसे की टोपल्या, झाडू, हातपंखे—यांचेही प्रदर्शन आहे. पारंपारिक शेतीची साधने दाखवणारा एक विभागही आहे, जो भारताच्या कृषी वारशाची ओळख करून देतो.
मुलांसाठी आणि संस्कृतीप्रेमींसाठी खास ठिकाण
या म्युझियमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे शैक्षणिक मूल्य. येथे ठेवलेल्या अनेक वस्तू आजच्या पिढीने कदाचित कधी पाहिलेल्याही नसतील.
त्यामुळे हे कलादालन विशेषतः मुलांसाठी—
- एक जिवंत सांस्कृतिक वर्ग होऊ शकतो.
- भारतीय लोककला आणि हस्तकलेची ओळख त्यांना होईल.
- स्क्रीनपासून दूर वास्तव अनुभव देणारे एक योग्य स्थान आहे.
प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे पाहायला मिळतात, तर शेवटी बाहुल्यांच्या खेळासाठी छोटा रंगमंच आहे—एकूणच कलादालन अशा प्रकारे साकारलेले आहे की, कलादालनाच्या प्रवेशापासून ते संपूर्ण संग्रहालय पाहून होईपर्यंतचा सगळा वेळ- इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेल्या क्षणांचा एक अनमोल अनुभव होऊन जातो.
कुडाळजवळील या चाकोरी बाहेरील सांस्कृतिक ठिकाणाला नक्की भेट द्या
कुडाळजवळील पिंगुळी गावात असलेले हे ठाकरवाडी कलादालन; कोकण परिसर, गोवा रोड ट्रिप किंवा ऑफबीट महाराष्ट्र पर्यटन स्थळे शोधणाऱ्या प्रवाशांसाठी उत्तम ठिकाण आहे.
- वारसा पर्यटन अनुभव
- महाराष्ट्रातील वेगळी संग्रहालये
- भारतीय संस्कृतीचा अभ्यास
हे जर तुम्हाला आवडत असेल …तर हे ठिकाण तुमच्या प्रवासात नक्की समाविष्ट करा.
कुडाळ–गोवा मार्गावरील एक अवश्य भेट देण्याजोगा सांस्कृतिक थांबा
ठाकरवाडी कलादालनाला भेट दिल्यानंतर; सुनियोजित पद्धतीने केलेल्या प्रवासापेक्षा कधीकधी नियोजन न करता अचानक समोर आलेला प्रवासातील अनुभव अधिक सुंदर असू शकतो असे मला वाटले.
ठाकरवाडी कलादालन हे फक्त संग्रहालय नाही—तर भारताच्या लुप्त होत चाललेल्या सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा एक मनापासूनचा प्रयत्न आहे.
कधी कुडाळ–गोवा मार्गावरून जात असाल, तर फक्त पुढे जाऊ नका… थोडा वेळ थांबा, आत जा आणि इतिहासाला स्वतःची कहाणी सांगू द्या.