घोटा म्हणजे गावठी आंबा. जो साले काढून चोखून खाल्ला जातो. आंबट गोड चवीच्या ह्या आंब्याचा गोव्यामध्ये बनविला जाणारा पारंपारिक पदार्थ म्हणजे घोटाचे सासव. कोंकणी भाषेत सांसवा म्हणजे मोहरी (mustard seeds). हिंग मोहरीची फोडणी देऊन केलेल्या ह्या पदार्थामध्ये, खोबऱ्याच्या वाटपामध्येही मोहरीचे दाणे घातले जातात. अशाप्रकारे मोहरीची कळेल न कळेल अशी किंचित कडू, आंब्याची आंबटगोड आणि वाटपात घालण्यात येणाऱ्या मिरचीची तिखट चव. असे चौरस चवीचे पक्वान्न म्हणजे घोटाचे सासव

Ghota

घोटाचे सासव करण्यास लागणारे साहित्य आणि कृती

साहित्य:
  • घोटा (गावठी आंबे): ७-८
  • गूळ: तीन मोठे चमचे 
  • सुक्या मिरच्या: ६-७
  • हळद पूड: १/४ चमचा
  • किसलेला नारळ: १ वाटी
  • मोहरी: १ लहान चमचा
  • मिरीचे दाणे: अर्धा लहान चमचा
  • मीठ: चवीप्रमाणे
फोडणीसाठी साहित्य:
  •  खोबरेल (अथवा उपलब्ध असलेले कुठलेही तेल): एक मोठा चमचा
  • मोहरी: १ लहान चमचा
  • हिंग: दोन चिमटी
  • कडीपत्ता: ७-८ पाने 
  • मेथी : चिमूटभर
          Ghotache Saansav
          कृती:
          1. घोटा स्वच्छ धुवून त्यांची साले काढून टाकायची. 
          1. मोहरीचे दाणे मंद आंचेवर साधारण भाजून घ्यावे.
          1. एका मिक्सरच्या भांड्यात किसलेले खोबरे, सुक्या मिरच्या, भाजलेले मोहरीचे दाणे, मिरी, हळद हे सारे आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. 
          1. हे वाटण एका भांड्यामध्ये ओतावे. त्यामध्ये आवश्यक तितके म्हणजे साधारण अर्धा ते एक वाटी पाणी घालावे, मंद आंचेवर शिजवावयास ठेवावे.
          1. वाटणाला उकळी आली की त्यामध्ये सोललेल्या आंब्यांचा थोडा रस पिळून ते आंबे त्यात सोडावे.
          1. चार पाच मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे. त्यामध्ये गूळ आणि मीठ घालून आणखीन २-३ मिनिटे शिजू द्यावे. तोपर्यंत फोडणी करून घ्यावी.
          1. फोडणीच्या वाटीत तेल घालावे. तेल तापले की त्यात मोहरी घालावी.
          1. मोहरी तडतडली की त्यामध्ये मेथी दाणे, कडीपत्त्याची पाने व हिंग घालून गॅस बंद करावा.
          1. शिजत आलेल्या सासवामध्ये फोडणी घालून गॅस बंद करावा.

          तिखट,आंबट, गोड, चवीचे हे घोटाचे सासव चपातीसोबत किंवा नुसतेच तोंडी लावणे म्हणून अप्रतिम लागते.

          काही सूचना :

          घोटा बहुतेक आंबट गोड चवीचीच असतात. त्यामुळे शक्यतो यामध्ये चिंच घालण्याची आवश्यकता नाही. परंतु कधी घोटा खूप गोड असतील तर चमचाभर चिंचेचा कोळ घालावा. कधी घोटा अधिक आंबट असल्यास गुळाचे प्रमाण वाढवावे.

          कॅटेगरी Goan Food

          error: Content is protected !!